ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालडोह शाळेचे खो-खोमध्ये तालुकास्तरावर निर्विवाद वर्चस्व

१४ व १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या चारही संघांचा दणदणीत विजय; कबड्डीतही उल्लेखनीय कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- सन २०२६-२७ अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय पावसाळी शालेय बालक्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल, पालडोहच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याची छाप उमटवत खो-खो स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. १४ व १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या चारही खो-खो संघांनी प्रथम क्रमांक पटकावत पालडोहच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

पालडोह शाळेची खो-खोमधील यशस्वी परंपरा यंदाही कायम राहिली आहे. गतवर्षी या शाळेच्या संघांनी विभागस्तरासह राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. याच यशाची पुनरावृत्ती करत यंदाही विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी केली.

नुकत्याच झालेल्या कबड्डी व खो-खो स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुला-मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. कबड्डीमध्ये १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांनी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारत उपविजेतेपद मिळविले. तर खो-खोमध्ये १४ वर्षांखालील मुलांचा संघ, १४ वर्षांखालील मुलींचा संघ तसेच १७ वर्षांखालील मुलांचा आणि मुलींचा संघ अशा चारही संघांनी प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले.

खो-खोच्या चारही सामन्यांमध्ये पालडोहच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांवर प्रभावी मात करत विजयश्री मिळवली. खेळाडूंची चपळता, सांघिक नियोजन, शिस्त आणि जिद्द यामुळे ही कामगिरी शक्य झाली. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप चौधरी, केंद्र टेकामांडवा येथील केंद्रप्रमुख मोरे, शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र दिगदेवतुलावर, क्रीडा मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र परतेकी, तसेच सुनील आडे, विनोद खवशी, सतीश गाकरे, निकिता इंझळकर, प्रशांत कोटनाके, ढेंगेकर, गणपत कुंडगीर व महेश शेंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

तसेच शिक्षणप्रेमी गणपत धुळगुंडे, शालेय व्यवस्थापन समिती, गावातील पालक आणि राम वारलवाड, जब्बार शेख, अकबर शेख, राष्ट्रपाल कांबळे यांनी विद्यार्थ्यांना ऑटोची सुविधा उपलब्ध करून देत स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केले. सर्व मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पालडोहच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर मिळवलेले हे यश आगामी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून, “खेळातून शिस्त, जिद्द आणि यश” या शाळेच्या क्रीडा परंपरेला यामुळे आणखी बळ मिळाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये