ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर नगर परिषदेचा अंकुश

भद्रावती नगर परिषदेची सूचना : अपघातांची मालिका रोखण्यासाठी कठोर पाऊल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          शहरातील महामार्ग तसेच बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते भांदक रेल्वे स्थानक मार्गावर रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्याने अपघातांची मालिका सुरू होती. यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर भद्रावती नगर परिषदेने पशुपालकांवर अंकुश आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांच्या पुढाकाराने तसेच मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेने यासंदर्भात अधिकृत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गाय, बैल, म्हैस आदी जनावरे शहरातील6 मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर सोडू नयेत, असे आवाहन पशुपालकांना करण्यात आले आहे.

रस्त्यावर मोकाट जनावरे असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते. यापूर्वीही नगर परिषदेने घंटागाडीच्या माध्यमातून रस्त्यावर जनावरे न सोडण्याबाबत वारंवार सूचना केल्या आहेत. मात्र, काही पशुपालकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

१ सप्टेंबरपासून कारवाईचा इशारा

नगर परिषदेच्या जाहीर सूचनेनुसार, १ सप्टेंबर २०२६ पासून रस्त्यावर आढळणाऱ्या जनावरांना जैन मंदिर येथील गोशाळेत दाखल करण्यात येणार आहे. जैन मंदिर गोशाळेच्या नियमानुसार एकदा गोशाळेत टाकण्यात आलेली जनावरे परत मिळणार नाहीत, असेही सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांची नोंद ठेवून ती रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘जनावरे घरी, रस्ते मोकळे’ची गरज

दुभती जनावरे घरी आणि इतर जनावरे दारी, ही जबाबदारी पशुपालकांनी स्वीकारणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये