सुयोग भोयर यांचा नंदोरी टोल नाक्यावर “सर्जिकल स्ट्राईक”
W.C.B.T.R. टोल कंपनीवर आर. टी. ओ.ची दंडात्मक कारवाई : सुयोग भोयर यांच्या तक्रारीला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर टोल रोड लिमिटेड (W.C.B.T.R.L.) अंतर्गत नंदोरी टोल नाका सध्या केवळ टोलवसुलीपुरताच मर्यादित राहिल्याचा आरोप होत असून, वाहनचालकांना आवश्यक सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. महामार्गाची दुरवस्था, नियमांचे उल्लंघन करणारी वाहने आणि अस्वच्छ शौचालयांमुळे वाहनचालकांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
नंदोरी टोल नाक्याच्या अखत्यारीतील परिसरात अनेक वाहने आवश्यक कागदपत्रे व सुविधांच्या अभावात धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही वाहने विनानंबर रस्त्यावर धावत असल्याची बाबही समोर आली आहे. तसेच काही वाहनांची पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) दोन वर्षांपासून झालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. वाहकाअभावी काही वाहने अक्षरशः पडून असल्याचेही दिसून येते.
रुग्णवाहिकेसह अन्य वाहनांच्या स्थितीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
दरम्यान, टोल नाक्यावर असलेल्या शौचालयांची अवस्था अत्यंत गंभीर असून स्वच्छतागृहे अस्वच्छ व आजारी पडलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. टोलवसुली करताना वाहनचालकांकडून शुल्क घेतले जाते; मात्र त्यांना अपेक्षित मूलभूत सुविधा मिळत नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे.
या गैरसोयींबाबत माजी जिल्हाध्यक्ष, कामगार सेना सुयोग भोयर यांनी सतत पाठपुरावा करीत आवाज उठविल्यानंतर गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी आर टी.ओ विभागाचे मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे व त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या आदेशानुसार तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णवाहिकेसह, चार ट्रॅक्टर,एक जेसीबी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
टोलवसुलीसोबतच वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा, स्वच्छतागृहे, रस्त्याची देखभाल तसेच वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.



