ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज – आयुष नोपानी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी. 

राजेंद्र मर्दाने, वरोरा.

        आगामी गणेशोत्सव तसेच अन्य धार्मिक उत्सव शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस व प्रशासन सज्ज आहे. गणेश मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले.

गणेशोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर वरोरा पोलिस ठाण्याच्या वतीने सिद्धिविनायक मंगल कार्यालयात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना आयुष नोपानी म्हणाले की, गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करावी. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनि प्रदूषणाबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रत्येक गणेश मंडळाने मंडप परिसरात किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्वयंसेवक तैनात ठेवावेत. सोशल मीडियाचा वापरही जबाबदारीने आणि काळजीपूर्वक करावा.

संशयास्पद आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून नागरिकांनी दूर राहावे. मद्य किंवा अमली पदार्थांच्या नशेत शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना मंडप परिसरातून बाहेर काढावे किंवा तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही नोपानी यांनी केले. ग्रामीण भागात सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी संदीप मस्के यांनी आवश्यक परवानगीशिवाय गणेशमूर्तीची स्थापना करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले.

आमदार करण देवतळे यांनी गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच विसर्जन मिरवणुकीसाठी शासनाच्या नियमांच्या चौकटीत पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विसर्जनाच्या दिवशी विशेषतः राजकीय पक्षांच्या मंडपांमध्ये डीजेला परवानगी न देता केवळ माईकला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना केली. विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री ११.०० वाजेपर्यंतचा वेळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.

बैठकीत वीजपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि विसर्जन व्यवस्था याबाबत संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला.

बैठकीला नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बकाल, तहसीलदार योगेश कौटकर, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलावर्ग, नागरिक मोठ्या उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. पोलिस उपनिरीक्षक शरद भस्मे यांनी केले, तर आभार पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये