खा. धानोरकर यांच्या पुढाकाराने गोंडपिपरी एमआयडीसी भागातील वारस नोंदणी पूर्ववत सुरू
नागरिकांना मोठा दिलासा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी, मयत व्यक्तींच्या जागेवर कायदेशीर वारसांची नोंद करण्यासाठी, जमिनीचे हक्क हस्तांतरित करण्यासाठी तसेच इतर विविध महसुली व प्रशासकीय कामांसाठी रखडलेली वारस नोंदणी प्रक्रिया अखेर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तातडीच्या पुढाकाराने पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. विशेषतः गोंडपिपरी एमआयडीसी परिसरातील प्रस्तावित भूसंपादन व इतर तांत्रिक कारणांमुळे ही वारस नोंदणीची कामे खोळंबली होती, ती आता प्रशासनाकडून मार्गी लावण्यात आली आहेत.
गेल्या काही काळापासून वारस नोंदणी बंद असल्याने गोंडपिपरी तालुक्यातील विशेषतः प्रस्तावित एमआयडीसी भागातील अनेक नागरिकांना, मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांना व इतर सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवण्यात आणि जमिनीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासनाला यावर त्वरित मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी, “शासकीय योजनांपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये आणि नागरिकांची कामे अडून राहू नयेत यासाठी वारस नोंदी तातडीने सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे,” अशी ठाम भूमिका घेतली.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या सूचनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी प्रशासनाने गोंडपिपरी एमआयडीसी प्रस्तावित गावांमधील रखडलेली वारस नोंदणी प्रक्रिया तात्काळ पुन्हा सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वारस नोंदणी पूर्ववत सुरू झाल्यामुळे मयत व्यक्तींच्या वारसदारांसह क्षेत्रातील इतर सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या भागातील महसूल कार्यालयाशी संपर्क साधून वारस नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन खासदार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.



