जिल्हा परिषद शाळेलगत घाणीचे साम्राज्य! विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; शेणखताचे ढिगारे व अतिक्रमणामुळे परिसरात दुर्गंधी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती नगरपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारालगत तसेच संरक्षण भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच संरक्षण भिंतीलगत शेणखताचे मोठमोठे ढिगारे टाकण्यात आल्याने अस्वच्छतेत आणखी भर पडली आहे. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या समोरच तालुका कृषी कार्यालय असल्याने या मार्गावर दिवसभर अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र शाळेलगत साचलेली घाण, शेणखताचे ढिगारे आणि त्यातून येणारी दुर्गंधी यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाक दाबून जाण्याची वेळ आली आहे. विशेषतः पावसाळ्यात ओलावा वाढल्याने दुर्गंधी अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या अस्वच्छ वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज याच परिसरातून ये-जा करावी लागत असल्याने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार चिंताजनक मानला जात आहे. शिक्षकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तालुका कृषी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनाही या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबत संबंधित यंत्रणांची भूमिका काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संरक्षण भिंतीला लागून शेणखताचे ढिगारे टाकून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे घाण व शेणखत साचणे तसेच अतिक्रमण होणे ही गंभीर बाब असून, नगरपंचायतीने तातडीने परिसराची पाहणी करून स्वच्छता मोहीम राबवावी आणि अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे.
*शाळा व्यवस्थापन समितीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह*
विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक असताना शाळेच्या प्रवेशद्वारालगतच अस्वच्छता निर्माण झाल्याने “शाळा व्यवस्थापन समिती केवळ नावालाच आहे का?” असा सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळा प्रशासन, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विभाग आणि नगरपंचायत प्रशासन यांनी समन्वयाने या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
*तातडीने कारवाईची मागणी*
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न गांभीर्याने घेऊन जिवती नगरपंचायत प्रशासन, शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करावी, परिसरातील घाण व शेणखताचे ढिगारे हटवावेत, अतिक्रमणाची पाहणी करून नियमानुसार कारवाई करावी आणि परिसराची नियमित स्वच्छता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



