वरोरा शहरातील श्रीगणेशोत्सव उत्साहात, शिस्तीत अन् शांततेत साजरा करा : खा. धानोरकर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : वरोरा शहरातील श्रीगणेशोत्सव अत्यंत उत्साहात, भक्तिमय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या अनुषंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागरिकांना व सर्व गणेश मंडळांना नियमांचे तंतोतंत पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “वरोरा शहराला सामाजिक सलोखा आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे, ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे तसेच आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्वांनी सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपत हा उत्सव साजरा करावा.”
या बैठकी प्रसंगी आमदार करण देवतळे, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाखल, उपविभागीय अधिकारी संदीप भास्के, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभय लोहे, सिद्धार्थ मेश्राम, नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, उपनगराध्यक्षा योगिता नेरकर, शांतता समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



