ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चार बोलेरो पिकअपमधून १२ गोवंशांची अमानुष वाहतूक उघड

२४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      गोवंशाची अवैध व अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या चार बोलेरो पिकअप वाहनांवर भद्रावती पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत १२ गोवंशांसह एकूण २४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. २५) मांगली गावाच्या दिशेने करण्यात आली.

भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा DYSP सचिन खेत्रे यांना गुप्त बातमीदारामार्फत काही बोलेरो पिकअप वाहनांमधून गोवंशांची संशयास्पदरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मांगली गावाच्या दिशेने नाकाबंदी केली.

दरम्यान, संशयित चार बोलेरो पिकअप वाहने पोलिसांच्या निदर्शनास येताच चालकांनी वाहने पुढे घेऊन जाण्याचा व पोलिसांच्या नजरेतून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून चारही वाहने अडवून ताब्यात घेतली. पंचांसमक्ष तपासणी केली असता प्रत्येक वाहनात तीन याप्रमाणे एकूण १२ गोवंश आढळून आले.

वाहनांमध्ये जनावरांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. पुरेशी जागा, चारा-पाणी व सुरक्षित व्यवस्था नसल्याने जनावरांना अनावश्यक त्रास होईल अशा पद्धतीने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच गोवंश कोठून आणण्यात आले, त्यांची मालकी कोणाची आहे व त्यांना कोठे आणि कोणत्या उद्देशाने नेण्यात येत आहे, याबाबत समाधानकारक वैध कागदपत्रे चालकांकडे आढळली नाहीत.

या प्रकरणी शुभम भाऊराव वनवे (३०), साहिल ईश्वर बनसोडे (२२), राकेश आनंदाराव उताने (३६), तिघेही रा. लखेवेर, ता. जि. भंडारा, तसेच अजित दादाजी बारतीने (२१), रा. आष्टी काकडे, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर या चार चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाईत चार बोलेरो पिकअप वाहनांची अंदाजे किंमत २२ लाख रुपये, तर १२ गोवंशांची अंदाजे किंमत २ लाख १९ हजार रुपये, असा एकूण २४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त गोवंशांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून आवश्यक प्रमाणपत्र घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

या प्रकरणी प्राण्यांना क्रूरतेपासून प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(d), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ मधील लागू तरतुदी तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गोवंशांची वाहतूक, मालकी, वाहतुकीचा उद्देश, वाहनमालकांची भूमिका तसेच या प्रकरणामागे अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई DYSP सचिन खेत्रे व सपोनि वीरेंद्र केदारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि संतोष केदारे, पोहवा गोपाल (ब.नं. २५७९), पोहवा देव आनंद (ब.नं. २३०९), पोहवा शेंदरे (ब.नं. २४५४), पो.अं. प्रेम (ब.नं. १८६), पो.अं. योगेश (ब.नं. १९३२), मपो.अं. दिपमाला (ब.नं. १९०८), सहाय्यक चालक पोहवा (ब.नं. २२८५) तसेच होमगार्ड चालक यांनी सहभाग घेतला.

गोवंशाची अवैध व अमानुष वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भद्रावती पोलिसांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये