ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेणगावात जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलूसे मोहम्मदी उत्साहात

शांतता, बंधुता व सामाजिक ऐक्याचा संदेश; सर्व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रजा जामा मस्जिद, शेणगाव यांच्या वतीने शेणगाव शहरात जुलूसे मोहम्मदीचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांसह सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केला.

मिरवणुकीदरम्यान नात शरीफ, दुरूद शरीफ व सलाम पठण करण्यात आले. तसेच अल्लाह व पैगंबर हजरत मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या गौरवाचे नारे देण्यात आले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. या जुलूसमधून शांतता, प्रेम, बंधुता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. समाजात परस्पर सौहार्द व भाईचारा कायम राखण्याचे आवाहनही करण्यात आले.

जुलूसे मोहम्मदीमध्ये सहभागी भाविकांसाठी थंड पाणी, चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, शेणगाव यांच्या वतीनेही मिरवणुकीत सहभागी होत पाणी व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सर्वधर्मसमभाव, सामाजिक सलोखा आणि एकतेचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.

मुख्य मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर जुलूसे मोहम्मदीचा समारोप रजा जामा मस्जिद येथे झाला. यावेळी पवित्र कुरआन पाकचे तिलावत करण्यात आले. त्यानंतर फातेहाखानी करून देश, राज्य व समाजात शांतता, सुख-समृद्धी आणि भाईचारा नांदावा, यासाठी विशेष दुआ करण्यात आली.

कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मसाला भात, खिचडी आणि खीरचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

जुलूसे मोहम्मदीदरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनासह सर्व समाजबांधवांचे रजा जामा मस्जिद व्यवस्थापन समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये