एमआयडीसी प्रकल्पातील शेतकऱ्यांनो…दलालांपासून सावधान..!
शेतकरी एकता संघर्ष कृती समितीचे आवाहन ; गोंडपिपरी एमआयडीसीबाबत धानोरकर-धोटेंनी भूमिका स्पष्ट करावी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
१३ गावांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची मागणी.
गोंडपिपरी :_ तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसीचा प्रश्न सध्या निर्णायक वळणावर पोहोचला असून, जमीन जाण्याच्या भीतीने प्रभावित गावांतील शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत काही स्वयंघोषित शेतकरी नेते व दलालांकडून एमआयडीसीच्या नावाखाली शेतीच्या सौदेबाजीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकरी एकता संघर्ष कृती समितीने केला आहे. अशा प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी एमआयडीसीबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आवाहन समितीने केले.
गोंडपिपरी विश्रामगृहात शनिवारी (दि. २२) आयोजित पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. खासदार धानोरकर व माजी आमदार धोटे यांनी प्रस्तावित एमआयडीसीमुळे प्रभावित होणाऱ्या १३ गावांचा दौरा करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा आणि त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
गोंडपिपरी एमआयडीसी विरोधातील न्यायालयीन लढ्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकरणात ‘स्टेटस को’ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ‘पॅकेज’बाबत झालेली चर्चा ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची भावना पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांची जमीनच वाचविण्याची मागणी असताना मोबदला किंवा पॅकेजच्या चर्चेला प्राधान्य देणे योग्य नसल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या न्यायालयीन लढाई सुरू असून, गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेला कोअर कमिटीचे सदस्य कमलेश निमगडे, राजेश कवठे, शालिकराम माऊलीकर, ॲड सचिन फुलझेले, शेतकरी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष मारोती भोयर, सचिव माधव लडके, अतुल झाडे, अमित भसारकर, सुदर्शन दुर्गे, विपिन मोरे, अनुप भोयर, योगेश कोरवते, राहुल सोनटक्के, गजानन ढवस, संतोष निकोडे, रामदास मोहुलै सुनील पुडके आदी शेतकरी उपस्थित होते.
*विनामूल्य लढाईसाठी वकिलांचा सत्कार*
एमआयडीसीविरोधातील न्यायालयीन लढ्याच्या सुरुवातीपासून विनामूल्य कायदेशीर लढा देणारे ॲड. दीपक चटप आणि ॲड. बोधी रामटेके यांचा पत्रकार परिषदेत शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. भविष्यातील विधिमंडळ, न्यायालयीन तसेच रस्त्यावरील लढाईसाठी शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दोन्ही युवा वकिलांनी सत्काराला उत्तर देताना दिली.
*कोनसरीच्या नागरिकांनी घेतला गोंडपिपरीचा आदर्श*
गोंडपिपरी एमआयडीसीला ‘स्टेटस को’ मिळाल्याची माहिती
परिसरात पोहोचल्यानंतर शेजारील गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी परिसरातील शेतकऱ्यांनीही याची दखल घेतली आहे. गोंडपिपरीच्या न्यायालयीन लढ्याचा आदर्श घेत तेथील शेतकऱ्यांनी ॲड. दीपक चटप व अँड बोधी रामटेके यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
*…अन्यथा गावबंदी*
खासदार धानोरकर आणि माजी आमदार धोटे यांनी गोंडपिपरी एमआयडीसी बाबत भूमिका स्पष्ट करावी भूमिहीन आणि तीळमात्र संबंध नसताना केवळ चमकेगिरीसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना सोबत घेऊन चालविलेला आटापिटा थांबवावा अन्यथा विद्यमान आमदारासारखे आपणासही गावबंदी करू, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला



