अहिल्यानगर येथील धिरज परदेशी हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल भद्रावती तर्फे निवेदन सादर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या धिरज कन्सिंग राजपूत यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, प्रखंड भद्रावती यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार भद्रावती तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भद्रावती यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनानुसार, धिरज परदेशी हे मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करीत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
धिरज परदेशी यांनी भगवा टिळा लावला होता, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. जात अथवा धर्म पाहून हत्या करण्याचे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच आरोपींची अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत, विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटला जलदगतीने न्यायालयासमोर चालवावा आणि सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. शक्य असल्यास दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.



