ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत रानभाज्या व तेलबिया महोत्सव उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी : संतोष इंद्राळे

जिवती :- स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे पौष्टिक महत्त्व, पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन तसेच तेलबिया पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक संधींबाबत जनजागृती करण्यासाठी जिवतीत रानभाज्या व तेलबिया महोत्सव उत्साहात पार पडला. महोत्सवात कृषी सखी, कृषी ताई आणि उमेदच्या कृषी सखींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

महोत्सवात विविध रानभाज्या व तेलबिया पिकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. रानभाज्यांचे औषधी व पौष्टिक महत्त्व, त्यांचे संवर्धन, तेलबिया पिकांची लागवड, उत्पादनवाढ तसेच प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः महिलांनी कृषी क्षेत्रात पुढाकार घेऊन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी एम. जी. गावडे होते. आत्मा तालुका सल्लागार समितीचे अध्यक्ष भरत बिरादार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी समिती सदस्य प्रदीप काळे, उपतालुका कृषी अधिकारी केळकर व ढाकणे, अंबुजा फाउंडेशनचे पानघाटे, उमेदचे ब्रांच मॅनेजर उद्धव मडावी, पाणी फाउंडेशनच्या सविता पेटकर, बीटीएम कि. व्ही. चंदनबटवे, सहाय्यक कृषी अधिकारी सिद्धेश्वर गेडाम, तंत्र सहाय्यक सुमित घुले तसेच तहसीलदार रूपाली मोगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी रानभाज्यांचे संवर्धन, पारंपरिक अन्नपद्धतीचे जतन, तेलबिया पिकांना प्रोत्साहन आणि महिलांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभाग, आत्मा, उमेद, पाणी फाउंडेशन, अंबुजा फाउंडेशन तसेच कृषी सखी व कृषी ताईंनी विशेष परिश्रम घेतले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रानभाज्या व तेलबिया पिकांबाबत निर्माण झालेली जागरूकता हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये