वर्ध्यात रस्ते सुरक्षेसाठी हेल्मेट जनजागृती
१०० दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने वर्धा पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. १२ ऑगस्ट) सकाळी १०.३० वाजता भूगाव टी पॉइंट, वर्धा ते हिंगणघाट रोड येथे एवोनिथ स्टील कंपनी तसेच पोलीस ठाणे सावंगी आणि वर्धा जिल्हा वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा व हेल्मेट जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच १०० दुचाकी चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.
कार्यक्रमाला एवोनिथ स्टीलचे एचआर हेड आर. के. शर्मा, जीएम एच. आर. श्री प्रशांत जौदन, अनर्व नागसी, एस.ए. खान, सुनिल महाडीक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पोलीस निरीक्षक विनोद गिरी, पोलीस ठाणे सावंगीचे सपोनि विजय धुळे, पोउपनि अमोल लगड तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, १ जानेवारी २०२६ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वर्धा जिल्ह्यात हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्या दुचाकीस्वारांवर ४,६०० केसेस करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
“हेल्मेट वापरा – सुरक्षित प्रवास करा, आपले जीवन अमूल्य आहे,” असा संदेश देत नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.



