ब्लास्टिंगच्या हादऱ्याने घरांना तडे; भिंती-छत कोसळले!
बरांज मोकासात केपीसीएलच्या कोळसा उत्खननाविरोधात संताप : नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कर्नाटका पावर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) कंपनीकडून बरांज (मो.) परिसरात कोळसा उत्खननासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगच्या तीव्र हादऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन भिंती व छताचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नुकसानग्रस्त घरांचा तातडीने पंचनामा करून संबंधित कुटुंबांना योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
अर्जदारांच्या निवेदनानुसार, दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास कंपनीकडून ब्लास्टिंग करण्यात आली. या स्फोटामुळे निर्माण झालेल्या तीव्र हादऱ्यांचा फटका बरांज मोकासा परिसरातील घरांना बसला. घर क्र. १७,१७/१,१७/२,१७/३, ९२९, ७८७ आणि १२३३ या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. घरांच्या भिंतींना तडे जाण्यासह छतावरील कौले व इतर बांधकाम कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*‘ब्लास्टिंग थांबवा, आधी नागरिकांची सुरक्षा पाहा!’*
वारंवार होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे घरांच्या बांधकामावर परिणाम होत असल्यास प्रशासनाने याकडे केवळ नुकसानभरपाईच्या दृष्टीने न पाहता नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न म्हणून पाहावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशाच प्रकारचे हादरे बसल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
*नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करण्याची मागणी*
ब्लास्टिंगमुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक घराचा अधिकृत पंचनामा करावा. त्यानंतर घरांचे तांत्रिक मूल्यांकन करून झालेल्या नुकसानीची भरपाई केपीसीएल कंपनीकडून तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच ब्लास्टिंगची पद्धत, तीव्रता आणि नागरिकांच्या घरांवर होणारा परिणाम याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*अशोक निखाडे यांच्यासह चौघांचे निवेदन*
या प्रकरणी अशोक निखाडे, वंदना खोब्रागडे, नितीन गेडाम आणि राहुल सरगे यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून नुकसानग्रस्तांना न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, चंद्रपूर तसेच पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ब्लास्टिंगच्या हादऱ्यामुळे घरांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना विलंब न करता भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.



