पोलीस अधीक्षक मा.श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी घेतला आर्वी उपविभागाचा आढावा
गुन्ह्यांचा निपटारा व नवीन कायद्यांबाबत दिले मार्गदर्शन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ रोजी कारंजा पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट देऊन आर्वी उपविभागातील कायदा व सुव्यवस्थेचा तसेच प्रलंबित गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीस आर्वी उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) सरिता चव्हाण यांच्यासह आर्वी उपविभागांतर्गत येणाऱ्या आर्वी, आष्टी, तळेगाव आणि कारंजा या चारही पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व दिलेले निर्देश
१. गुन्ह्यांचा आढावा व तत्पर निर्गती
उपविभागातील प्रलंबित गुन्हे, गंभीर गुन्हे तसेच दाखल तपासावर असलेल्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पोलीस ठाण्यातील किमती मुद्देमाल व तपासातील मुद्देमालाची लवकरात लवकर कायदेशीर निर्गती करून तो मूळ मालकांना/फिर्यादींना परत करण्याबाबत स्पष्ट सूचना मा. पोलीस अधीक्षक यांनी दिल्या.
२. नवीन गन्हेगारी कायदे (New Criminal Laws) मार्गदर्शन
देशात लागू झालेल्या नवीन कायदे आणि सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तपासात पारदर्शकता, गती आणि नवीन कायद्यातील तरतुदींचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
३. कर्मचारी समस्या व उपाययोजना
पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, कामाचे स्वरूप व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
४. कायदा व सुव्यवस्था आर्वी उपविभागातील सर्व पोलीस ठाणेदारांनी आपापल्या हद्दीत गस्त वाढवून गुन्हेगारीवर वचक बसवावा व नागरिकांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले…



