ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मैदानात; चंद्रपूर जिल्ह्यासाठी २४ तास अखंड कृषी वीजपुरवठ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम संपेपर्यंत कृषी पंपांना विशेष बाब म्हणून अखंड वीजपुरवठ्याची मागणी

चांदा ब्लास्ट
शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष उपाययोजनांची विनंती; महावितरण, ऊर्जा विभाग आणि जिल्हा प्रशासनाला समन्वयाने कार्यवाही करण्याची सूचना

चंद्रपूर :- जिल्ह्यातील कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्या कष्टाचे पीक वाचावे, या संवेदनशील भूमिकेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी  ऊर्जा मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी पंपांना खरीप हंगाम संपेपर्यंत विशेष बाब म्हणून २४ तास अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. वेळेवर सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास हजारो हेक्टरवरील पिके वाचतील आणि लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळेल, या उद्देशाने आ. मुनगंटीवार यांनी शासनाकडे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील प्रमुख कृषिप्रधान जिल्ह्यांपैकी एक असून धान, सोयाबीन, कापूस, तूर तसेच इतर खरीप पिकांवर लाखो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झाले असले तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नसल्याने अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला असून धान, सोयाबीन आणि कापूस पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. परिणामी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या कृषी विद्युत पंपाद्वारे सिंचन हाच शेतकऱ्यांसमोरील एकमेव पर्याय आहे. मात्र, महावितरणकडून कृषी पंपांना केवळ आठ तास वीजपुरवठा केला जात असल्याने संपूर्ण क्षेत्राला वेळेत पाणी देणे शक्य होत नाही. धानासारख्या नियमित पाण्याची आवश्यकता असलेल्या पिकांसह सोयाबीन व कापूस ही पिकेही वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून सिंचनात होणारा विलंब उत्पादनात मोठी घट घडवून आणू शकतो, असे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी आणि सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या पिकांचे संरक्षण करणे ही शासनाचीही जबाबदारी असल्याचे नमूद करत आ. मुनगंटीवार यांनी खरीप हंगाम संपेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कृषी पंपांना विशेष बाब म्हणून २४ तास अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

यासोबतच महावितरण कंपनीला आवश्यक अतिरिक्त वीज उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने निर्देश देण्यात यावेत, कृषी वीजपुरवठा कमी दाबाचा किंवा वारंवार खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, ऊर्जा विभाग, महावितरण आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करून वीजपुरवठ्यावर सातत्याने देखरेख ठेवावी, तसेच चंद्रपूर जिल्ह्याला विशेष कृषी वीजपुरवठा जिल्हा म्हणून घोषित करून शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय सिंचन करता येईल, अशी व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली आहे.

वेळेवर सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास हजारो हेक्टरवरील पिके वाचतील, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळेल. शेतकरी सक्षम राहिला तरच कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहील, असे नमूद करत शेतकरीहिताचा विचार करून चंद्रपूर जिल्ह्यासाठी २४ तास अखंड वीजपुरवठ्याचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये