८ लाख ३६ हजरांच्या विदेशी दारूसह स्विफ्ट कार जप्त : चालक पसार
भद्रावती पोलिसांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती पोलिसांनी गुरुवारी (३० जुलै) पहाटे केलेल्या धडक कारवाईत सुमारे ८ लाख ३६ हजार ७६८ रुपयांचा विदेशी दारूसाठा व स्विफ्ट कार जप्त केली. मात्र, पोलिसांचा पाठलाग सुरू असतानाच चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून चंद्रपूरकडे मारुती सुझुकी स्विफ्ट झेड डी आय एमएच-०४-एचएफ-१२०८ या कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार भद्रावती टप्पा येथे पहाटे ५ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदीदरम्यान संशयित स्विफ्ट कार पोलिसांना दिसताच चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने चंद्रपूरच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. पाठलागादरम्यान चालकाने मौजा घोडपेठ गावात वस्तीच्या दिशेने वाहन वळविले. काही अंतरानंतर वाहन नजरेआड झाल्याने पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबविली.
शोधादरम्यान घोडपेठ येथील शंकर हेअर सलूनसमोर सदर कार बेवारस अवस्थेत उभी आढळली. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला.
कारमधून ऑफिसर चॉईस विदेशी दारूच्या १८० मि.ली.च्या १,७२८ निप्पा किंमत २,९५,४८८ तसेच ९० मि.ली.च्या ४८० निप्पा किंमत ४१,२८० असा एकूण ३,३६,७६८ रुपयांचा दारूसाठा आणि ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण ८,३६,७६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७१०/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. संतोष केदार, पो.उप.नि. गजानन तुपकर, सफौ. महेंद्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्तूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आदींनी यशस्वीपणे पार पाडली.



