ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ठाम पाठपुरावा : पीक विमा हप्ता कमी करण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका

आ.मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-यवतमाळमधील अन्यायकारक पीक विमा दरांचा मुद्दा कृषी मंत्र्यांसमोर ठामपणे मांडला; मुख्यमंत्रीस्तरावर स्वतंत्र बैठकीचे आश्वासन

चांदा ब्लास्ट


शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा हप्ता वाजवी करण्यासह मुदतवाढीबाबतही विभागाला तातडीच्या कार्यवाहीचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई- खरीप हंगाम २०२६ मध्ये चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या जास्तीच्या पीक विमा हप्त्याचा प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर ठामपणे मांडत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहामुळे कृषिमंत्री दत्तात्रयजी भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. चंद्रपूर आणि शेजारील जिल्ह्यांतील पीक विमा हप्त्यातील मोठी तफावत विचारात घेऊन शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी पीक विमा हप्ता वाजवी करण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, या विषयावर मुख्यमंत्रीस्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन योग्य निर्णय केला जाईल, असे आश्वासन कृषी मंत्री यांनी यावेळी दिले.

बैठकीच्या प्रारंभी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक पद्धतीने आकारण्यात आलेल्या पीक विमा हप्त्याचा मुद्दा ठोस आकडेवारीसह मांडला. शेजारील जिल्ह्यांमध्ये कमी विमा हप्ता असताना चंद्रपूर आणि यवतमाळमधील शेतकऱ्यांवर अधिक आर्थिक भार पडत असल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विमा हप्ता तातडीने वाजवी करण्यात यावा, अशी ठाम मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली.

बैठकीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीक विमा हप्त्यांबाबत सादरीकरण केले. त्यावेळी चंद्रपूर व शेजारील जिल्ह्यांतील पीक विमा दरांमधील मोठी तफावत आ.मुनगंटीवार यांनी आकडेवारीसह कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेत कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी कृषी विभाग, कृषी आयुक्तालय तसेच संबंधित यंत्रणांना विमा कंपनीशी समन्वय साधून प्रकरणाची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच या विषयावर मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक घेऊन योग्य निर्णय करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

बैठकीस कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी आयुक्तालयाचे प्रतिनिधी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.  यावेळी बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितापेक्षा मोठा कोणताही विषय असू शकत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी प्रत्येक स्तरावर सातत्याने आणि ठामपणे पाठपुरावा केला जाईल. पीक विमा, शेती, सिंचन, वीज किंवा बाजारभाव यांसारख्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरू राहील. शेतकऱ्यांचे हित जपणे हीच आपली सर्वोच्च जबाबदारी असून, त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पीक विम्यासाठी मुदतवाढीचे निर्देश,शेतकऱ्यांना दिलासा

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न प्राधान्याने मांडत पीक विमा भरण्याची मुदत वाढविण्याची आग्रही मागणी केली. त्यांच्या या मागणीची दखल घेत कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रयजी भरणे यांनी संबंधित विभागाला पीक विमा भरण्याची मुदत वाढविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच या संदर्भातील पुढील कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये