ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हळदा आवळगाव परिसरात दहशत पसरवणारी वाघीण अखेर जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा व आवळगाव परिसरात दहशत पसरवणाऱ्या T-120 या मादी वाघिणीला वनविभागाने अत्यंत कौशल्याने जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून भीती आणि दहशतीखाली जगणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दिनांक ०९ जुलै २०२६ रोजी अंदाजे दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास बल्लारपूर येथील रहिवासी अनिल भास्कर दिवटे (वय ३२ वर्ष) हे कुरण गट क्र. २१ मध्ये रानभाजी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी झाडीत दबा धरून बसलेल्या T-120 (मादी) वाघिणीने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले होते. या दुर्दैवी घटनेनंतर सदर वाघीण ही शेतशिवारात आणि गावाच्या लगतच सतत वावरत होती. यापूर्वीही या वाघिणीने या परिसरातील नागरिकांवर हल्ले करून त्यांना मृत्युमुखी पाडले होते, तसेच अनेक पाळीव प्राण्यांना ठार केले होते. सातत्याने होणाऱ्या य हल्ल्यांमुळे शेतात जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांमध्ये वनविभागाविरोधात मोठा रोष पाहायला मिळत होता.

भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होऊ नये, यासाठी या धोकादायक T-120 वाघिणीला तात्काळ जेरबंद करणे आवश्यक झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वनविभागाने तातडीने सूत्रे हलवून शोधमोहीम राबवली.

काल दिनांक २९ जुलै २०२६ रोजी उपक्षेत्र आवळगाव, नियतक्षेत्र हळदा मधील कक्ष क्र. २२२ मध्ये वाघीण आढळून आल्यानंतर R.R.T. चे पथक सज्ज झाले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (चंद्रपूर) पशुवैद्यकीय अधिकारी व R.R.T. प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी तात्काळ डॉर्ट तयार करून दिला. त्यानंतर अजय सी. मराठे (पोलीस हवालदार/शुटर) यांनी अत्यंत अचूक निशाणा साधत T-120 वाघिणीला डॉर्ट मारून यशस्वीरीत्या बेशुद्ध केले. बेशुद्ध झाल्यानंतर वाघिणीला सुरक्षितपणे पिंजऱ्यात हलवून पुढच्या कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आले.

सदर यशस्वी कारवाई डॉ. कुमारस्वामी एस. आर. (उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत अरविंद जे. (सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव, ब्रम्हपुरी) आकाश व्ही. सोनडवले (वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक, दक्षिण ब्रम्हपुरी) राकेश अहुजा (वन्यजीव तज्ज्ञ, ब्रम्हपुरी) यांच्यासह क्षेत्रीय सहाय्यक, वनरक्षक आणि R.R.T. पथकातील सदस्य विकास ताजने, योगेश लाकडे, प्रफुल एन. वाटगुरे, गुरुनानक ढोरे, दिपेश टेभुर्ने, वसीम शेख, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर व इतर वनकर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

वाघीण जेरबंद झाल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी वनविभागाचे आभार मानले असून आवळगाव-हळदा परिसरातील तणाव आता पूर्णपणे निवळला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये