ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण

गार्डन सोसायटी चंद्रपूरचा पुढाकार; राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूर :- गार्डन सोसायटी, चंद्रपूरच्या वतीने राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून हरित आणि स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे पक्ष्यांसाठी फळझाडे, सर्वांना सावली देणारे वृक्ष आणि सार्वजनिक ठिकाणी सुगंध दरवळावा यासाठी फुलझाडे मोठ्या प्रमाणात लावून पर्यावरणाचा समतोल राखणे हा आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व अधोरेखित करत भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमाला गार्डन सोसायटी, चंद्रपूरच्या अध्यक्षा शाहीन अहमद, उपाध्यक्षा अदिती तातावार, कोषाध्यक्षा ॲड. विजया बांगडे, सचिव वर्षा दत्तात्रेय व संजली चौहान,  अभिलाषा आवळे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. तसेच सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूरचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय आणि सुभाषसिंग गौर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

गार्डन सोसायटी, चंद्रपूरच्या पुढाकाराने  सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT) यांच्या महाविद्यालय परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध प्रजातींच्या फळझाडे, फुलझाडे, सावलीची झाडे तसेच औषधी वनस्पतींची लागवड करून हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक परिसर घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि झपाट्याने कमी होत असलेले हरित क्षेत्र लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. वृक्ष हे केवळ प्राणवायूचे स्रोत नसून पक्षी, प्राणी आणि मानवाच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण आधार आहेत. त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. विजया बांगडे यांनी दिली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध प्रकारची शोभिवंत, फळ देणारी, फुलझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गार्डन सोसायटी, चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजाने पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येऊन अशा उपक्रमांना चालना देणे ही काळाची गरज असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये