स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भाजपा महानगर कार्यालयात अभिवादन
आ. जोरगेवार यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण

चांदा ब्लास्ट
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महानगर प्रभारी अर्चर्ना डेहनकर, माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री सविता दंढारे, वंदना हातगावकर, मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी, नगरसेवक भालचंद्र दानव, कार्तिक बोरेवार, प्रवीण गिलबिले, सुमित बेले, कौसर खान, नीलिमा वनकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी स्व. अजित दादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. समाजहिताला प्राधान्य देत त्यांनी केलेले कार्य, जनसामान्यांशी जपलेला जिव्हाळ्याचा संबंध आणि विकासाभिमुख विचार आजही अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यातून समाजसेवा, लोकहित आणि विकासाची प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.



