समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; वर्ध्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
तथा एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा तालुक्यातील सालोड येथील टिपले कुटुंबावर काळाने घाला घातला असून समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिपले कुटुंबातील एका मुलीला पुण्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याने तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी कुटुंबीय पुण्याकडे गेले होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून परतीच्या प्रवासात असताना समृद्धी महामार्गावरील पुलगाव हद्दीत त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातस्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर नागपूर–मुंबई मार्गावरील एक ऑईल टँकरही पलटी झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू करण्यात आले.
टँकर पलटी झाल्यामुळे पुलगाव परिसरात काही काळ वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली. वर्धा पोलिसांनी पुढील किमान चार तास पुलगाव ते येळाकेळी आणि येळाकेळी ते पुलगाव दरम्यान समृद्धी महामार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. नागपूर–मुंबई तसेच मुंबई–नागपूर मार्गावरील वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.



