सावलीच्या जंगलातील 3 शाळा शिक्षकांविना कोलमडल्या!
५० विद्यार्थ्यांसाठी ०१ शिक्षक दया ; खुशाल लोडे यांची निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील पाथरी केंद्रांतर्गत येणारा सायखेडा परिसर पूर्णतः जंगलव्याप्त व दुर्गम ग्रामीण भाग आहे. या भागातील सायखेडा, उसरपार चक, जणकापूर आणि पालेबारसा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची प्रचंड कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होऊन भविष्य धोक्यात आले आहे. याबाबत शेतकरी विविध सेवा सहकारी संस्था, मंगरमेढा चे अध्यक्ष श्री खुशाल लोडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे निवेदन दिले आहे.
संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांच्या पत्राचा जा.क्र. 1236/2026, दि. 6-7-2026 च्या निवेदनानुसार, *सायखेडा जि.प. शाळेत* इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत फक्त 2 शिक्षक असून एकूण 76 विद्यार्थी आहेत. *पालेबारसा जि.प. शाळेत* इयत्ता 1 ली ते 4 थी साठी केवळ 1 शिक्षक आहे आणि 60 विद्यार्थी आहेत. तर *उसरपार चक शाळेत* इयत्ता 1 ते 7 पर्यंतचा भार देखील 1 शिक्षकावर असून 50 विद्यार्थी आहेत. L एकाच शिक्षकाला 6 ते 7 वर्ग सांभाळण्याबरोबरच BLA, SIR, मुख्याध्यापक आणि ट्रेनिंग मीटिंगचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.
शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अध्यक्ष खुशाल लोडे यांनी तातडीच्या मागण्या केल्या आहेत.
वरील सर्व शाळांमधील शिक्षकांची सर्व रिक्त पदे शासन नियमानुसार तातडीने भरती प्रक्रियेद्वारे भरावीत.
भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर शिक्षकांची त्वरित नियुक्ती करावी किंवा किमान 1 शिक्षक तातडीने उपलब्ध करून द्यावा.
जंगल व दुर्गम भागातील शाळांना प्राधान्याने शिक्षक उपलब्ध करून द्यावेत.
शिक्षकांची पदे त्वरित न भरल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील, याची गंभीर दखल घ्यावी असे संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांनी म्हटले आहे. शिक्षण विभागाने या तीन गावांसाठी लवकरात लवकर किमान एक शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही अध्यक्ष श्री खुशाल लोडे यांना दिली.



