घाटराई माता देवस्थान परिसरात विकासासंदर्भात आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे भाविकाच्या वतीने निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :_ तालुक्यातील पवित्र घाटराई माता देवस्थान तीर्थक्षेत्र येथे आमदार मा. देवराव दादा भोंगळे हे सहकुटुंब दर्शनाकरिता आले असता, त्या प्रसंगी त्यांना भाविकांच्या वतीने विकास कामांसंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये तीर्थक्षेत्राच्या अपुऱ्या सुविधांबाबत व भाविकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत माहिती देत विविध विकासकामांची मागणी करण्यात आली. घाटराई देवस्थान हे विदर्भासह तेलंगणा राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने भाविक येणारे श्रद्धास्थान असूनही येथे अद्याप रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, निवास व्यवस्था व इतर मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे.
निवेदनामध्ये प्रमुख मागण्यांमध्ये घाटराईपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण तसेच दरम्यानच्या नाल्यावर लहान पुलाची उभारणी, भाविकांसाठी निवास व्यवस्था व सभागृहाची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलची व्यवस्था, मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण व पर्यटन विकास, तसेच वीजपुरवठा आणि भाविकांना उन्हाळा व पावसाळ्यात संरक्षण मिळावे यासाठी ओपन शेड उभारणी या कामांचा समावेश करण्यात आला आहे.
या सर्व मागण्यांवर आमदार मा. देवराव दादा भोंगळे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी समस्त गावकरी व मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.



