दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या ५१ व्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण
खा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव

चांदा ब्लास्ट
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्याचे लाडके नेतृत्व आणि लोकनेते दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या ५१ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘भाऊंचा वारसा ग्रुप’ तर्फे आयोजित विविध सामाजिक व लोकहितकारी उपक्रमांची सांगता नुकतीच एका भव्य सोहळ्याने झाली. तरुणांच्या बुद्धिमत्तेला आणि ज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता धानोरकर जनसंपर्क कार्यालय, वरोरा येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला मुख्य मार्गदर्शक आणि प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास टिपले, नगर परिषद वरोराचे सभापती गजानन जिवतोडे व राहुल देवडे, लोकमान्य महाविद्यालयाचे डॉ. श्रीनिवास पिलगुलवार,स्पर्धेचे संयोजक पार्थ धानोरकर, तरंग सिंग, निलेश भालेराव, शुभम चिमूरकर, फिरोज पठाण, हितेश भालेराव, संदीप भडके, श्रेयश ढोके यांची उपस्थिती होती.
त्यांच्या शुभहस्ते या भव्य लेखी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत उमेदवारांना आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या लोकसेवेचा विचार आणि वारसा जनमानसात, विशेषतः युवा पिढीत अखंड जिवंत ठेवण्यासाठी बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चुरशीच्या स्पर्धेत पयोष्णिका काळबांडे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर अवनी खापणे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच रोशनी ढोके, विहान सोंधे आणि थोरवी लुतडे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक संपादन केला.
या कौतुक सोहळ्याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सर्व विजयी स्पर्धकांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. युवकांनी स्पर्धा परीक्षा व सामान्य ज्ञानाच्या जोरावर आपले व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, हाच भाऊंना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. या प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भाऊंचा वारसा ग्रुप’च्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले असून सर्व थरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रशांत खुळे यांनी केले.



