ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साहेब म्हाडा कॉलनीत राहतात म्हणून रस्ता दुरुस्ती…?

मात्र निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष ; नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नांदा फाटा :- कोरपना तालुक्यातील पिंपळगाव-नांदा हा जिल्हा परिषद अंतर्गत येणारा सुमारे 4 किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाला आहे. या रस्त्यावरील खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि धुळीच्या समस्येमुळे वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती न करता केवळ म्हाडा कॉलनीपर्यंतच्या सुमारे 500 मीटर भागाचीच दुरुस्ती करण्यात येत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता म्हाडा कॉलनीत वास्तव्यास असल्याने त्यांच्या विनंतीने प्राधान्याने दुरुस्त केला जात असल्याची कबुली अभियंत्याने दिली.

विशेष म्हणजे, पिंपळगाव-गडचांदूर रस्त्याच्या दुरुस्तीमधून शिल्लक राहिलेल्या निधीतून हे काम केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु या कामासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी किंवा तांत्रिक मान्यता आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर कोणतीही अधिकृत मंजुरी नसल्यास, ठेकेदार नेमक्या कोणत्या आधारावर बांधकाम विभागाच्या अभियंताच्या सांगण्यावरून एवढी “मेहरबानी” दाखवत रस्ता दुरुस्तीचे काम करत आहे, याबाबत नागरिकांना स्पष्ट उत्तर अपेक्षित आहे.

यापूर्वीही या मार्गावर निकृष्ट दर्जाची कामे झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र, त्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने संबंधित कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

संपूर्ण 4 किलोमीटर रस्ता नादुरुस्त असताना केवळ विशिष्ट भागालाच प्राधान्य का? शासकीय निधी, अंदाजपत्रक आणि कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाने खुलासा करून संपूर्ण रस्त्याची गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

 (पिंपळगाव ते गडचांदूर रस्त्याच्या कामाच्या मंजुरीचे उर्वरित लांबीचे पॅचिंग करण्यात आले कुठलाही वेगळा निधी नाही. संतोष राठोड उपविभागीय अभियंता कोरपना)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये