लखमापूर स्टेट बँक समोर हातपंपावर रेतीचा ढिगारा
संपूर्ण कोरपना तालुक्यात हेच चित्र ; वाहतुकीलाही अडथळा

चांदा ब्लास्ट
ग्रामपंचायत महसूल विभागाचे साफ दुर्लक्ष
गडचांदूर :_ लखमापूर येथील स्टेट बँक समोर हातपंपावर रेतीचा ढिगारा टाकल्यामुळे गावातील नागरिकांना पाणी भरण्यास मोठी गैरसोय होत आहे.तसेच बँकेत येणाऱ्या ग्राहकांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे.
. कोरपना तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे साठवून ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. गावांतील मुख्य रस्ते, चौक तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात रेतीचे ढिगारे असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सर्वत्र वाळूचे मोठमोठे ढीग दिसत आहेत.खुलेआम रेतीची वाहतूक आणि साठवण सुरू असल्याचे चित्र आहे.हे दृश्य प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक आहे. अवैध रेती साठवण आणि वाहतुकीवर प्रभावी कारवाई न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून,संबंधित रेतीला आवश्यक रॉयल्टी किंवा परवानग्या आहेत का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने तपास करून योग्य ती कारवाई करून रेतीचे ढिगारे हटवून हातपंप पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



