ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संगणक परिचालकांच्या मानधनासाठी विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ठाम आवाज; सरकारकडून दर महिन्याला वेळेत मानधनाचे आश्वासन

'सरकारने दिलेला शब्द पाळलाच पाहिजे'; संगणक परिचालकांच्या न्याय्य हक्कासाठी आ. मुनगंटीवार यांची आग्रही भूमिका

चांदा ब्लास्ट

प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत मानधन अदा करण्याची ग्रामविकास मंत्र्यांची सभागृहात ग्वाही

मुंबई – राज्यभरातील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये कार्यरत हजारो संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी ठाम भूमिका घेतली. मानधनातील सातत्याने होणारा विलंब या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक अडचणी निर्माण करणारा असल्याचे अधोरेखित करत, शासनाने दिलेला शब्द पाळून दर महिन्याला निश्चित वेळेत मानधन अदा करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी सभागृहात केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रभावी पाठपुराव्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान नियमित मानधन वितरित करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.

चर्चेदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत, संगणक परिचालकांना दर महिन्याला निश्चित मानधन वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आर्थिक अडचणी हा वेगळा विषय असला तरी शासनाने दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मानधन वेळेवर न मिळाल्यास या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवते, त्यामुळे दर महिन्याला नियमित मानधन देण्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नवीन कंपनीच्या नियुक्तीची प्रक्रिया प्रलंबित राहिल्याने आणि उपस्थिती अहवाल वेळेत प्राप्त न झाल्यामुळे काही महिन्यांचा विलंब झाल्याचे सांगितले. मात्र, यापुढे संगणक परिचालकांचे मानधन नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान अदा करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी विधानसभेत दिले.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे संगणक परिचालकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. सरकारने नियमित मानधन वितरणाबाबत दिलेल्या आश्वासनामुळे राज्यभरातील हजारो संगणक परिचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये