ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आर्वी पोलिसांतर्गत टाकरखेडा येथे ‘संवाद उपक्रम’ संपन्न

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी साधला जनतेशी थेट संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस प्रशासन आणि जनता यांच्यात थेट समन्वय वाढवून नागरिकांच्या अडीअडचणी जागेवरच सोडवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘संवाद’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आज, दिनांक ३० जून २०२६ रोजी मौजा टाकरखेडा (ता. आर्वी) येथील संत लाहनुजी महाराज संस्थान येथे एका विशेष भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.

दुपारी १२:०० ते ०२:०० या वेळेत पार पडलेल्या या विशेष ‘संवाद’ बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे, यात केवळ पोलीस विभागच नाही, तर महसूल, पंचायत समिती, आरोग्य, कृषी, विद्युत, वन विभाग आणि इतर सर्वच महत्त्वाच्या प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर एकत्रित आले होते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या विविध विभागांशी संबंधित प्रलंबित समस्या आणि तक्रारी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडता आल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या संवादादरम्यान टाकरखेडा व परिसरातील सुमारे ३०० ते ४०० नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून गावातील मुख्य समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने गावात ‘पोलीस चौकी’ची स्थापना करण्यात यावी, आर्वी ते टाकरखेडा या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा (लाईट जाणे) सुरळीत करावा आणि वन विभागाशी संबंधित असलेल्या बिबट्याच्या वाढत्या त्रासापासून तात्काळ सुटका करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश होता. विद्युत विभागाच्या समस्येचे निवारण करून पुढील ८ दिवसांत विजेची समस्या सोडवण्याचे आणि खराब रस्त्याचे काम पुढील ८ दिवसांत प्रत्यक्ष सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

पोलीस अधीक्षकांनी स्थानिक ठाणेदारांना अवैध धंद्यांवर आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. गावात चालणाऱ्या कोणत्याही अवैध धंद्यांची किंवा संशयास्पद हालचालींची ‘गोपनीय माहिती’ थेट पोलीस अधीक्षकांच्या संपर्क यंत्रणेवर देण्याचे आवाहन त्यांनी केले, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल असेही आश्वस्त केले. गुन्हेगारी नियंत्रण आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस व जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणे गरजेचे असल्याचे सांगत पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेशी थेट नातं जोडणारा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. यापूर्वी देखील पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २५० ‘संवाद’ उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी (आर्वी) श्री. विश्वास शिरसाठ, संत लाहनुजी महाराज संस्थान टाकरखेडा चे सचिव सतिषभाऊ ठाकरे, तहसीलदार श्री. हरिश काळे, आर्वी वन परिक्षेत्राचे राऊंड अधिकारी, आर्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर, पोलीस कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच टाकरखेडा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या एकाच छताखालील शासकीय सुसंवादामुळे टाकरखेडा परिसरात पोलीस प्रशासन आणि शासनाविषयी अत्यंत समाधानाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये