जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जागतिक ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या रवी नायर फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.स्वप्नील रामटेके यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ऑलिंपिक दिनाचे औचित्य साधून विशेष प्रेरणादायी व्याख्यान व चर्चा सत्राचे आयोजन करुन दि .२३ जून रोजी जिल्हा क्रीडा कार्यालयात जागतिक ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.क्रीडा संस्कृती चा प्रचार करणे आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.कार्यक्रमाची सुरुवात ऑलिम्पिक मशाल प्रज्वलित करुन आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या रवी नायर फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.स्वप्नील रामटेके यांची तर जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे,तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे,सांजली चन्नावार,गणेश यल्लावार यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी ऑलिंपिक चळवळीचा इतिहास व महत्व उपस्थितांना समजावून सांगत खेळाडूंनी तंदुरुस्त राहण्यासाठी आणि ऑलिंपिक चे ध्येय साध्य करण्यासाठी नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले.तसेच डॉ.स्वप्नील रामटेके यांनी खेळाडूंच्या शारिरीक तंदुरुस्तीचे महत्व, दुखापती पासून बचाव, मानसिक सक्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी आवश्यक बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले.या विशेष दिनानिमित्त विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्थानिक पातळीवरील होतकरु खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यांच्यात क्रीडा स्पर्धांविषयी उत्साह निर्माण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम,सर्व क्रीडा तालुका अधिकारी, क्रीडा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या प्रसंगी क्रीडा प्रेमी,प्रशिक्षक, खेळाडू आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



