नगर पंचायत पोंभुर्णा येथे अत्याधुनिक ‘डेस्लजिंग वाहन’ सेवेत; लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने नगर पंचायत पोंभुर्णा यांच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक डेस्लजिंग वाहनाचे (सेप्टिक टँक उपसा वाहन) लोकार्पण गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी उत्साहात पार पडले.
या वाहनाचे लोकार्पण नगर पंचायत अध्यक्षा सौ. सुलभा गुरुदास पिपरे यांच्या शुभहस्ते, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार तसेच आरोग्य सभापती दर्शन गोरंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या अत्याधुनिक वाहनामुळे शहरातील सेप्टिक टँकची सफाई अधिक सुरक्षित, जलद व वैज्ञानिक पद्धतीने करता येणार असून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच टँक ओव्हरफ्लो होण्याच्या समस्येवर त्वरित उपाय उपलब्ध होणार आहे.
नगर पंचायतमार्फत ही सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांना खासगी कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कापासून दिलासा मिळणार असून, कमी खर्चात आणि विश्वासार्ह सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “पोंभुर्णा शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी नगर पंचायत कटिबद्ध असून, या नवीन डेस्लजिंग वाहनामुळे स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळेल.”
लोकार्पण सोहळ्याला नगर पंचायतीचे नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवीन वाहनाचे पूजन करून त्याचे स्वागत केले आणि शहराच्या सेवेत दाखल झालेल्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले.


