ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना व गडचांदूर ग्रामीण रुग्णालयांतील दंतवैद्यकीय अधिकारीची रिक्त पदे त्वरित भरावी 

भाजपा शहराध्यक्ष अमोल आसेकर यांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपणा :_ तालुक्यातील नागरिकांना शासकीय स्तरावर दंतोपचार सेवा उपलब्ध होत नसल्याने खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरपणा व गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दंतवैद्यकीय अधिकारी ची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या रिक्त पदांची तात्काळ भरती करण्यात यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष अमोल असेकर यांनी राजूर आमदार देवराव दादा भोंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, कोरपना तालुका हा दुर्गम व ग्रामीण भाग असून येथील नागरिकांसाठी शासनाकडून विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण रुग्णालयांमधील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने या सुविधांचा लाभ नागरिकांना मिळत नाही. विशेषतः दंतवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे दातांच्या आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना खासगी दवाखान्यांमध्ये जावे लागत आहे.

कोरपणा ग्रामीण रुग्णालयात दंतोपचारासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध असूनही अनेक वर्षांपासून दंतवैद्यकीय अधिकारी नसल्याने ती धूळ खात पडून आहे. परिणामी शासनाने खर्च करून उपलब्ध करून दिलेल्या साधनसामुग्रीचा कोणताही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नसून तेथेही दंतवैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे.

यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दंतोपचारासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असून त्यांची आर्थिक व मानसिक गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या परिसरातच मिळावी यासाठी कोरपना व गडचांदूर ग्रामीण रुग्णालयांतील दंतवैद्यकीय अधिकारी पदे तात्काळ भरून नियमित सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

आमदार देवराव दादा भोंगळे यांनी या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये