वर्धा उपविभागाची ‘गुन्हे आढावा बैठक’ संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल वर्धा यांनी दिनांक २२ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे वर्धा उपविभागाची पोलिस स्टेशन निहाय गुन्हे आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीत वर्धा पोलिस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. प्रमोद मकेश्वर यांनी त्यांचे विभागातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, मालमत्ता विषयक गुन्हे, अवैध दारू तस्करी आणि संघटित गुन्हेगारी तसेच महिला व बाल सुरक्षा आणि ‘मिसिंग’ केसेस बाबत पोलीस कारवाईचा सविस्तर आढावा सादर केला.
बैठकीत पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कामगिरीचे सखोल विश्लेषण करून गुन्हेगारीवर कडक वचक निर्माण करण्यासाठी व पोलीस ठाण्यांच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी उपविभागात दाखल झालेले मालमत्ता विषयक गुन्हे, उघडकीस आलेले व प्रलंबित गुन्हे, चोरीला गेलेला मुद्देमाल आणि जप्त केलेला माल याचा आढावा घेण्यात आला.
पोलीस अधीक्षकांनी ठाणे प्रभारी विलास पाटील यांना त्यांच्या पोलिस स्टेशन अंतर्गत उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथके स्थापन करावीत आणि सर्व प्रलंबित प्रकरणे व अर्ज जलद गतीने निकाली काढावेत, दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची यादी अद्ययावत करून त्यांच्यावर तडीपारी आणि (MPDA), MCOCA अंतर्गत कठोर कारवाई करावी. दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी व तरुणांना व्यसनापासून वाचवण्यासाठी NDPS कायद्यांतर्गत व्यापक कारवाया कराव्यात. महिला व बालकांचा शोध घेण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, सायबर गुन्ह्यांसाठी NCCRP पोर्टलचा प्रभावी वापर करावा, प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट्स’ (Black Spots) शोधून वाहतूक पोलिसांच्या मदतीने उपाययोजना कराव्यात तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गाव व वॉर्ड पातळीवर ‘संवाद कार्यक्रम’ राबवून नागरिकांच्या स्थानिक समस्यांचे जागेवरच निवारण करावे अशा सूचना दिल्या.
पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा यांनी वर्धा उपविभागतील शरीरविषयक तसेच मालविरुद्ध घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेणेबाबत व योग्य त्या उपाययोजना करणेबाबत त्याचप्रमाणे सराईत गुन्हे गारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करणेबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.



