पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकारातून वर्धा नगरपरिषदेच्या शाळा होताय ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’
नपच्या शाळेचे रुपडे पालटतेय, शैक्षणिक सुधारणा, उपक्रम ; ठिकठिकाणी डिजिटल वाचनालय व वातानुकूलित अभ्यासिका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : खाजगी शाळांमधील शिक्षण अतिशय महागडे झाले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना या शाळांचे शिक्षण परवडण्यासारखे नाही. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नगरपरिषदेच्या शाळांमध्ये कमी खर्चात गुणवत्तापुर्वक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. या शाळांतील शैक्षणिक सुधारणांसाठी पालकमंत्र्यांनी 7 कोटी 76 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे नगर परिषदेच्या शाळांमध्ये आता ज्ञानाचा नवा प्रकाश पसरणार आहे.
नगर परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणच नव्हे तर अभ्यासासाठी सोयीस्कर, आधुनिक आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे, या उद्देशाने पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवले जात आहे. खाजगी शाळांमध्ये भरमसाठ रक्कम भरून विद्यार्थ्यांना जे शिक्षण उपलब्ध होते, त्या तोडीचे शिक्षण, शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात, असा पालकमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच विविध योजनेतून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
वैशिष्टपूर्ण योजनेतून वर्धा शहरातील रामनगर येथील चित्तरंजन दास प्राथमिक शाळेत डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी 1 कोटी 49 लाख तर वातानुकुलीत अभ्यासिकेसाठी 49 लाख 96 हजाराचा निधी देण्यात आला. शिवाजी प्राथमिक शाळेत वातानुकूलीत अभ्यासिकेसाठी 49 लाख 98 हजार, वसंत प्राथमिक शाळा, विवेकानंद शाळेचे नुतनीकरण व आवश्यक शैक्षणिक सुविधेसाठी 1 कोटी 50 लाख, कमला नेहरू शाळेत ई-वाचनालय व रीडिंग हॅाल तयार करणे 99 लाख 98 हजार देण्यात आले.
नागरी दलितेत्तर योजनेतून शहरातील नगरपरिषदेच्या विविध शाळांमध्ये विविध विकास कामे 1 कोटी 99 लाख, स्वामी विवेकानंद शाळेत सुरक्षाभिंत बांधकाम व मैदान विकसित करणे 9 लाख 90 हजार, वसंत प्राथमिक शाळेत गेटचे काम व मैदान विकसित करणे 9 लाख 22 हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत लाला लजपतराय शाळेभोवती संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी 58 लाख 89 हजराचा निधी देण्यात आला आहे.
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डिजिटल वाचनालय व अभ्यासिका*
या विकासकामांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नगर परिषदेने सुरू केलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डिजिटल वाचनालय व अभ्यासिका होय. वाचनालय पुर्णपणे वातानुकूलित असून हायस्पीड वाय-फाय इंटरनेट, डिजिटल ई-बुक्स आणि ई-वाचनालय, विद्यार्थ्यांना शांतपणे अभ्यास करता यावा, यासाठी स्वतंत्र केबिन्स आणि प्रशस्त टेबलची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
*शालेय पायाभूत सुविधांचा कायापालट*
पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून होत असलेल्या शैक्षणिक विकास कामांमध्ये आधुनिक क्रीडांगण निर्मिती आणि सुरक्षेसाठी मजबूत सुरक्षाभिंत बांधली जात आहे. शाळेचे संपूर्ण विद्युतीकरण आणि अद्ययावत प्लंबिंगच्या कामांमुळे शाळा आता अधिक सोयीस्कर बनल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्यासह त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी स्वतंत्र परीक्षा केंद्रांची स्थापना केली जात आहे.
*खाजगी शाळांच्या तोडीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न – डॉ.पंकज भोयर*
नगर परिषदेच्या शाळा ही उद्याच्या पिढीची ज्ञानमंदिरे आहेत. विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तोडीच्या सुविधा सरकारी शाळेतच मिळाव्यात, यासाठी माझा प्रयत्न आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वर्धेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल. आमचे ध्येय केवळ साक्षरता वाढवणे नसून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्पर्धेत टिकवून ठेवणे हे आहे. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डिजिटल वाचनालय’ हे याचेच एक पाऊल आहे. वर्धेतील शाळा आता ‘मॉडेल शाळा’ म्हणून ओळखल्या जातील आणि इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.



