पोंभुर्णा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीतील पीओपी अवघ्या सहा महिन्यांत उध्वस्त
लाखो रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीत करण्यात आलेल्या स्लॅबच्या पीओपीचे काम अवघ्या सहा महिन्यांत उध्वस्त झाल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून करण्यात आलेले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दवाखान्याच्या छतावरील पीओपी अनेक ठिकाणी तडे जाऊन खाली पडत असल्याने कर्मचारी, पशुपालक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्याने करण्यात आलेल्या कामाची एवढ्या कमी कालावधीत झालेली दुरवस्था पाहता संबंधित कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम पूर्ण झाल्यानंतर त्याची योग्य तपासणी झाली का, वापरण्यात आलेले साहित्य दर्जेदार होते का, याची चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात जिल्हा परिषद बांधकाम विभाग पोंभुर्णा “ते आम्ही नाहीच” अशा भूमिकेत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करावी, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई करून इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. शासनाचा निधी वाया जाऊ नये आणि सार्वजनिक बांधकामांमध्ये पारदर्शकता व गुणवत्ता राखली जावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



