टी.सी., मार्कशिट देतांना रक्कम घेतल्यास शाळांवर होणार कारवाई
एक वर्षापूर्वीच शिक्षण विभागाचे आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
शाळा सोडल्याचा दाखला (टी. सी.) आणि गुणपत्रिका (मार्कलिस्ट) देतांना विद्यार्थी आणि पालकांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम किंवा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शुल्क वसूल न करण्याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका देताना कोणतीही रक्कम वसूल करू नये, असे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
प्राप्त तक्रारीनुसार, काही ठिकाणी विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका देण्यासाठी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः खाजगी संस्थांच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून शाळा सुधार निधीच्या नावाखाली शुल्क घेतले जात असल्याचे निदर्शनास आली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत कारवाईचे निर्देश दिले आहेत.
शासनाच्या यापूर्वीच्या निर्णयानुसार आणि शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्याची तरतूद नाही. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि संबंधित शैक्षणिक संस्थांनी कोणत्याही प्रकारची रक्कम वसूल करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, ज्या शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे शुल्क वसूल केले असेल तर त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम परत करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केल्यानंतर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या पत्रात सर्व विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना तातडीने सूचना देण्यात आल्या असून, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळणार असून, शैक्षणिक कागदपत्रांच्या नावाखाली होणाऱ्या अनधिकृत शुल्कवसुलीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



