ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोजोलीच्या पृथ्वीराजने केली देशपातळीवरील परीक्षा उत्तीर्ण

DBT–BET JRF परीक्षेत १६४ वा क्रमांक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि आयुष्यातील मोठ्या दुःखांवर मात करत गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील पृथ्वीराज रुमाजी झाडे यांनी देशपातळीवरील प्रतिष्ठेच्या DBT-BET (DBT-JRF) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी दिलेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत पृथ्वीराजने १६४ वा क्रमांक मिळवत केवळ आपल्या गावाचाच नव्हे, तर जिल्हा आणि राज्याचाही मान उंचावला आहे. देशभरातून निवड झालेल्या अवघ्या २६४ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये त्याने स्थान मिळवले आहे.

लहान वयातच आईचे छत्र हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना पृथ्वीराजने परिस्थितीसमोर हार न मानता शिक्षणालाच आपले शस्त्र बनवले. शिक्षणासाठी गाव सोडून बाहेर पडलेल्या या जिद्दी तरुणाने अनेक अडचणींचा सामना करत दिवस-रात्र अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू ठेवला.

अखंड मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर पृथ्वीराजने DBT-BET परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. या यशामुळे तो आता जैवतंत्रज्ञान (बियोटेकनॉलॉजि ) विषयात पीएच.डी. करण्यासाठी आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ ) मिळविण्यासाठी पात्र ठरला आहे. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात मोठी झेप घेण्याचे त्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

गरिबी ही यशाच्या आड येत नाही, तर जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे पृथ्वीराज झाडे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांच्या यशातून मिळत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये