वर्धा पोलिस दलाचा गौरव पोलीस कर्मचारी पंकज टाकोणे यांची चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड स्कूल गेम्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलिस दलासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी बातमी समोर आली आहे. वर्धा पोलिस दलातील कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी तसेच राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू पंकज टाकोणे यांची ३० जून ते १० जुलै २०२६ दरम्यान शेंगलू (चीन) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित वर्ल्ड स्कूल गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
पोलिस सेवेत कार्यरत असताना क्रीडा क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पंकज टाकोणे यांनी आपल्या अथक परिश्रम, शिस्तबद्ध कार्यपद्धती, समर्पण आणि खेळावरील निष्ठेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या मानाच्या निवडीमुळे वर्धा पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
ग्रामीण भागातील अनेक होतकरू खेळाडूंना घडविण्यात आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात पंकज टाकोणे यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाच्या प्रशिक्षक मंडळात स्थान मिळाल्याने त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला नवे सुवर्णपान जोडले गेले आहे. वर्धा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीही ही निवड प्रेरणादायी ठरत असून, कर्तव्य आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत उत्कृष्टता साध्य करता येते, याचे पंकज टाकोणे हे उत्तम उदाहरण ठरले आहेत.
पंकज टाकोणे यांच्या या उल्लेखनीय यशाचे सम्पूर्ण श्रेय हे पोलीस अधीक्षक वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे तसेच वर्धा पोलीस दलाचे खेळ विभाग प्रमुख श्री. राजेश उमरे यांना जाते. वर्धा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, क्रीडाप्रेमी तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
“कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडताना क्रीडा क्षेत्रातही देशाचा तिरंगा अभिमानाने फडकविण्याचे कार्य करणारे पंकज टाकोणे यांची ही निवड युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून वर्धा पोलिस दलाच्या गौरवशाली परंपरेत भर घालणारी आहे.”
(आशिष चिलांगे) सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा.



