भाजप प्रदेश संघटनात्मक कामगिरीत चंद्रपूर महानगर राज्यात अव्वल
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनेच्या वतीने मंगळवारी मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये जिल्हा बैठक, मंडळ बैठक, एसआयआर अभियान, प्रशिक्षण शिबिरे, बूथस्तरीय कार्य, ‘मन की बात’ कार्यक्रम, संघटन विस्तार तसेच कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क यांसारख्या विविध बाबींचे मूल्यमापन करण्यात आले.
या सर्व निकषांमध्ये चंद्रपूर महानगराने उत्कृष्ट नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि संघटनात्मक कार्याच्या बळावर राज्यात अव्वल स्थान प्राप्त केल्याचे गौरवोद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात काढले. चंद्रपूर महानगराच्या कार्याचा विशेष गौरव करत राज्यातील सर्वोत्तम संघटनात्मक कामगिरी म्हणून त्याची नोंद घेण्यात आली.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर महानगराने गेल्या काही महिन्यांत संघटन विस्तार, बूथ सक्षमीकरण, नियमित बैठका, प्रशिक्षण उपक्रम तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद आणि जनसंपर्क अभियानांनाही विशेष प्राधान्य देण्यात आले. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणून चंद्रपूर महानगराने राज्यात अव्वल स्थान पटकावल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
प्रदेश पातळीवर चंद्रपूर महानगराच्या कार्याची झालेली दखल ही संपूर्ण संघटनेसाठी अभिमानाची बाब मानली जात असून, या यशामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळातही संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबवून चंद्रपूर महानगराची राज्यातील अग्रस्थानी असलेली ओळख अधिक बळकट करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
परिश्रम, संघटन आणि समर्पण यांच्या बळावरच यशाचे शिखर गाठता येते, याची प्रचिती चंद्रपूर महानगराच्या या उल्लेखनीय कामगिरीतून पुन्हा एकदा आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय महाअभियानांतर्गत आयोजित सर्व कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यांची नोंद आणि माहिती ‘सरल ॲप’वर वेळेत अपलोड करण्यात आल्याचा विशेष उल्लेखही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बैठकीत केला. तसेच एसआयआर अभियानाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने कार्य करण्याच्या सूचना देखील प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिल्या.



