मोफत वीजच्या स्वप्नाला बँकेचा ब्रेक; वैयक्तिक सोलर योजनेसाठी नागरिक हैराण
बँक ऑफ इंडिया कर्जच देत नसल्याने लाभार्थ्यांचा संताप; शासनाच्या योजनेवरच प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
२५ वर्षे मोफत वीज मिळणार या आशेने हजारो नागरिकांनी घरगुती सोलर योजनेकडे धाव घेतली; पण आता हीच योजना अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. शासनाकडून मोठमोठ्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात वैयक्तिक सोलर योजनेसाठी कर्ज मिळवताना नागरिकांची अक्षरशः फरफट सुरू आहे.
विशेषतः बँक ऑफ इंडिया शाखांमधून कर्ज मंजुरीसाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची गंभीर तक्रार समोर येत आहे. लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की, “ऑनलाइन अर्ज पूर्ण, सोलर कंपनीची प्रक्रिया पूर्ण, महावितरणाची नोंदणी पूर्ण… तरीही बँक फाईल पुढे सरकत नाही.”
सोलर योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर बँकांनी सहकार्यची भूमिका घेणे आवश्यक आहे. व्ययक्तिक सोलर योजनांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करून अनावश्यक अटी शिथिल करून दिरंगाई थांबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागत आहे.
*कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक?*
सोलर योजनेत शासन अनुदान देत असले तरी उर्वरित रक्कमेसाठी बँकेचे कर्ज आवश्यक आहे. मात्र, अर्जदारांकडून वारंवार नवीन कागदपत्रे मागितली जात असल्याचा आरोप आहे. काहींना हमीदार, काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा पुरावा, तर काहींना वारंवार बँकेत बोलावले जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या प्रक्रियेमुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर येत आहे.
*योजना काढली शासनाने… पण त्रास नागरिकांना..!*
शासनाच्या जाहिरातींमध्ये योजना अत्यंत सोपी आणि सर्वांसाठी असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना बँकांच्या दारात हेलपाटे मारावे लागत असल्याने संताप वाढत आहे.
“मोफत वीज मिळणार म्हणून अर्ज केला; पण आता बँकांच्या फेऱ्याच संपत नाहीत,” अशी प्रतिक्रिया अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली.


