ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोरपणा येथे महिला मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा :_ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने स्व. भाऊराव चटप माध्यमिक आश्रमशाळा, कोरपणा येथे महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंअंतर्गत आदिवासी महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास कोरपणा तालुक्यातील सुमारे सहाशे आदिवासी महिला उपस्थित होत्या.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी श्री. विकास राचेलवार होते. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून लाभलेल्या तहसीलदार कु. पल्लवी आखरे यांनी महिलांकरिता महसूल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इत्यादी योजनांची माहिती दिली आणि पात्र व गरजू महिलांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कु. वैशाली भस्मे यांनी वन स्टॉप सेंटर (माझी कन्या / सखी वन स्टॉप सेंटर) योजनेअंतर्गत कौटुंबिक हिंसाचार किंवा अत्याचार पीडित महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, समुपदेशन आणि ५ दिवसांपर्यंत तात्पुरता आश्रय दिला जातो, महिला हेल्पलाइनद्वारे संकटात सापडलेल्या महिलांसाठी २४ तास मोफत दूरध्वनी सेवा उपलब्ध असून, याद्वारे तातडीने मदत आणि मार्गदर्शन पुरवले जाते, स्वाधार / उज्वला गृह योजनेअंतर्गत अनैतिक व्यापारातून मुक्त केलेल्या, बेघर किंवा कौटुंबिक छळामुळे निराश्रित झालेल्या महिलांना मोफत निवास, भोजन, वैद्यकीय उपचार आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतेर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित व निराधार महिलांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते अशी विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली आणि 1098 हा चाईल्डलाईन व 181 या महिला हेल्पलाईन क्रमांकांबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रतिनिधी कु. नीलू घरट यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महिलांना ‘विशेष प्रवर्ग’ मानले जाते, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या राज्यस्तरीय योजनेतून, नवीन सूक्ष्म व लघु उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना विशेष प्राधान्य आणि आर्थिक साहाय्य दिले जाते यामध्ये प्रकल्प खर्चावर 25% ते 35% पर्यंत अनुदान (सबसिडी) मिळते आणि केवळ 5% स्वगुंतवणूक करावी लागते, सुधारित बीज भांडवल योजना (Seed Money Scheme) योजनेअंतर्गत ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी या योजनेतून मार्जिन मनी (बीज भांडवल) उपलब्ध करून दिले जाते अशी विविध योजनांची माहिती दिली. तसेच उमेदचे अधिकारी श्री. मोहीत नैताम यांनी उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) ही ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय योजना असल्याचे सांगून उमेद अभियानांतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य (उदा. बिनव्याजी कर्ज), मोफत व्यावसायिक प्रशिक्षण आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते अशी माहिती दिली. स्वयं-सहायता गट (SHG) निर्मिती, चक्रनिधी व समुदाय गुंतवणूक निधी, बिनव्याजी कर्ज सुविधा, लखपती दीदी योजना इत्यादी योजनांबाबत त्यांनी मेळाव्यामध्ये विस्तृत मार्गदर्शन केले.

वरीलप्रमाणे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी महिलांसाठी, विशेषतः आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी व स्वयंरोजगार योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांकरिता आदिवासी विकास विभाग आदिवासी महिलांचे स्वतंत्र बचत गट उमेद / माविम यांच्या सहकार्याने सुरू करणार असून महिला सक्षमीकरणाकरिता या बचत गटांना आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र, आदिवासी विकास विभाग यांचेद्वारे उद्योजकता आणि व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना वित्त पुरवठा करण्यात येईल तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता विशेष योजना प्रस्तावित करण्यात येतील असेही त्यांचे भाषणातून सांगितले.

या महिला सक्षमीकरण मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक आदिवासी समाजकार्यकर्ते श्री. भरत आत्राम, कु. अश्विनी कोरंगे, श्री. प्रमोद कोडापे, श्री. मनोज तुमडाम, श्री. प्रेमदास मेश्राम, श्री. रोशन मरापे व श्री. सुभाष आत्राम यांची देखील याप्रसंगी यथोचित भाषणे झाली आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वत:ची, कुटुंबाची आणि समाजाची आर्थिक उन्नती साधण्यासाठी उपस्थित महिलांना आवाहन केले. तद्वतच त्यांनी तालुक्यातील आदिवासी महिलांना मेळाव्यामध्ये उपस्थित होण्यासाठी आणि मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गिरीश पोळ, सहायक प्रकल्प अधिकारी यांनी, सूत्रसंचालन कु. प्रीती कुत्तरमारे, प्राथमिक शिक्षिका यांनी तर आभार प्रदर्शन श्री. राजीव बोंगीरवार, सहायक प्रकल्प अधिकारी यांनी केले.

 मेळाव्याच्या आयोजनासाठी सहायक प्रकल्प अधिकारी श्री. डी. के. टिंगुसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. भाऊराव खडसे (मुख्याध्यापक), श्री. ज्ञानेश्‍वर गावंडे (सांख्यिकी सहाय्यक), कु. सरिता सोयाम (संघटक) व श्री. स्वप्नील उराडे (ऑपरेटर), श्री. रितीक मडावी (ऑपरेटर) यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी स्व. भाऊराव चटप माध्यमिक आश्रमशाळा, कोरपणा शाळेच्या संचालकांनी शाळेचे सभागृह व आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून सहकार्य केले.

विरांगणा राणी दुर्गावती योजनेअंतर्गत नवीन महिला बचत गटांची स्थापना करून आदिवासी विकास विभागातर्फे 100 टक्के अनुदानाच्या योजनांचा लाभ घेऊन आदिवासी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन याप्रसंगी प्रकल्प अधिकारी श्री. विकास राचेलवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये