नगरपालिका व महसूल प्रशासन या खोदकामाबाबत अनभिज्ञ
ऐतिहासिक डोलारा तलावात अवैध उत्खनन : दगडी पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह? : इको - प्रो ची माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ शहराच्या ऐतिहासिक वारशाचा भाग असलेल्या डोलारा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या उत्खननामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. तलावाच्या काठालगत खोदण्यात आलेले मोठे खड्डे आणि मोठ्या प्रमाणावर उपसा करण्यात आलेली माती यामुळे तलावाच्या संरचनेवर तसेच परिसरातील ऐतिहासिक दगडी पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तलाव परिसरात जेसीबीसह विविध यंत्रसामग्रीच्या सहाय्याने उत्खननाचे काम करण्यात आले. या कामामुळे तलावाचा नैसर्गिक आकार बदलल्याचे दिसून येत असून, आगामी पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहावर तसेच जलसाठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या इको-प्रो संस्थेचे संदीप जीवने, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर व अमोल दौलतकर यांनी प्रशासनाकडे चौकशी केली. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी डोलारा तलाव हा महसूल विभागाच्या अखत्यारित येत असल्याचे सांगत संबंधित काम तहसील प्रशासनाने केले असावे, अशी शक्यता व्यक्त केली. मात्र, तहसीलदारांकडे विचारणा केली असता प्रशासनामार्फत असे कोणतेही उत्खनन करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे नगरपालिका व महसूल प्रशासन या दोन्ही विभागांनी संबंधित खोदकामाबाबत अनभिज्ञता व्यक्त केल्याने, एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन नेमके कुणाच्या आदेशाने आणि कुणाच्या परवानगीने करण्यात आले, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. नागरिकांमध्ये याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
इतिहासप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींच्या मते, डोलारा तलाव परिसरातील ऐतिहासिक दगडी पूल हा शहराच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. उत्खननामुळे पुलाच्या पायाभूत रचनेवर ताण निर्माण होऊन भविष्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तलावातील जैवविविधता, जलस्रोत आणि पर्यावरणीय समतोल यांनाही धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून उत्खननासाठी जबाबदार असलेल्या व्यक्ती किंवा संस्थेची माहिती सार्वजनिक करावी, तसेच ऐतिहासिक डोलारा तलाव आणि दगडी पुलाच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी इको-प्रोच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“नगरपालिका आणि तहसील प्रशासन दोघेही उत्खनन केल्याचे नाकारत असतील, तर मग हे काम नेमके कुणाचे?” हा प्रश्न सध्या भद्रावती शहरात चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.
बॉक्स : नगरसेवक राहुल सोनटक्के यांची कबुली
“हे काम मी स्वतःच्या खर्चातून केले”
डोलारा तलाव परिसरातील उत्खननाबाबत डोलारा प्रभागाचे नगरसेवक राहुल सोनटक्के यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या कामासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. सोनटक्के यांनी सांगितले की, तलाव परिसरातील खोदकामासाठी नगर परिषद व महसूल विभागाकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याचे सांगून याबाबत मुंबई येथील कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती दिली.
तथापि, प्रत्यक्ष करण्यात आलेले खोदकाम आपण स्वतःच्या खर्चातून केल्याची कबुली राहुल सोनटक्के यांनी दिली. त्यामुळे प्रशासनाने या कामाची जबाबदारी नाकारल्यानंतर आता हे काम कोणत्या कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत व आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यानंतर करण्यात आले का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच ऐतिहासिक वारसा असलेल्या डोलारा तलाव परिसरात कोणतेही काम करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.



