ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुहेरी शोकांतिका : अधिक मासातील स्नानासाठी गेलेल्याचा मृत्यू

बेपत्ता युवकाचा मृतदेहही सापडला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        वर्धा नदी परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमुळे बल्लारपूर आणि सास्ती परिसरात शोककळा पसरली आहे. अधिक मासानिमित्त पवित्र स्नानासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर बेपत्ता झालेल्या युवकाचाही मृतदेह शोधमोहीमेदरम्यान नदीपात्रात आढळून आल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील सास्ती येथील रमेश लटारू गिरसावळे (वय ४८) हे ८ जून रोजी सायंकाळी रामनगर घाटावर अधिक मासानिमित्त स्नान करण्यासाठी गेले होते. धार्मिक श्रद्धा आणि परंपरेनुसार ते नदीत स्नान करत असताना अचानक खोल पाण्यात गेल्याने त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाने शोधकार्य सुरू केले. अखेर बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.

दरम्यान, बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्ड येथील रहिवासी दिपेश विनोद कलकोटवार (वय ३२) हा युवक मंगळवारी रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान स्कूटी घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काही काळ त्याचा संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांत माहिती दिली. त्याने वर्धा नदीत उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याने चंद्रपूर येथील बचाव पथक, स्थानिक पोहणारे आणि पोलिसांनी संयुक्तपणे नदी परिसरात शोधमोहीम राबविली.

अखेर बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास सास्ती पुलाखालील नदीपात्रात दिपेश कलकोटवार यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह दिसताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून मृत्यूची नेमकी कारणे आणि इतर बाबींचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. अल्पावधीतच वर्धा नदी परिसरात घडलेल्या या दोन दुःखद घटनांमुळे बल्लारपूर, सास्ती आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत असून नदीकाठावर जाताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये