फसव्या एमआरपी विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे 12 जूनला बाईक रॅली
नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या फसव्या एमआरपी (MRP) प्रणालीविरोधात जनजागृती करण्यासाठी तसेच उत्पादनावर आधारित एमआरपी निश्चित करण्याचा कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक १२ जून रोजी सकाळी १० वाजता भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या बाजारात अनेक वस्तूंवर अवास्तव एमआरपी छापून ग्राहकांची आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार ग्राहकांकडून सातत्याने केली जात आहे. उत्पादनाची वास्तविक किंमत आणि छापील एमआरपी यामध्ये मोठी तफावत असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असून त्यांना अधिक किंमत मोजावी लागत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित एमआरपी निश्चित करण्याचा कायदा करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली बाईक रॅली नाग मंदिर येथून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे. रॅलीनंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात येणार असून ग्राहकांच्या हिताच्या विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती यांनी सर्व ग्राहक, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, युवक मंडळे तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ग्राहक हक्कांचे संरक्षण आणि फसव्या एमआरपीच्या विरोधात एकजूट दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ग्राहकांच्या आर्थिक हितासाठी आणि बाजारातील पारदर्शकता वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



