वरोऱ्याचे सुपुत्र आयएएस आदित्य जीवने जळगाव मनपा आयुक्तपदी
वरोराकरांसाठी अभिमानाचा क्षण; प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
राजेंद्र मर्दाने, वरोरा.
*वरोरा* : शहरासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या घडामोडीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)चे प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालक सनदी अधिकारी आदित्य चंद्रभान जीवने यांची जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय फेरबदलाचे आदेश जारी करत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील रहिवासी असलेले आदित्य जीवने हे २०२१ बॅचच्या महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस.) अधिकारी आहेत. आपल्या अल्प सेवाकाळात त्यांनी विविध प्रशासकीय पदांवर उल्लेखनीय कामगिरी करून एक कार्यक्षम, अभ्यासू आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे.
परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी बीड जिल्ह्यात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भामरागड येथे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून करताना त्यांनी आपला आगळावेगळा ठसा उमटविला. त्यानंतर पुन्हा बीड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षभर सूत्रे सांभाळली. अलीकडेच, १६ जून २०२५ पासून ते छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणच्या प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. ऊर्जा क्षेत्रातील प्रशासन आणि व्यवस्थापनात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत राज्य शासनाने त्यांच्यावर जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविली आहे.
आदित्य जीवने यांच्या या नियुक्तीमुळे वरोराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून शहरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल वडील चंद्रभान जीवने, आई प्रतिमा जीवने, बहीण अनुजा जीवने तसेच मामा विशाल जुमडे आणि संपूर्ण कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आनंदवन मित्र मंडळाचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र मर्दाने, डॉ. प्रवीण मुधोळकर, नगरसेवक बंडू देऊळकर, राहुल देवडे, माजी प्राचार्य बी. आर. शेलवटकर, संजय गांधी, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यकालीन उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



