ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचा सेलू तालुक्यातील सालई येथे थेट ग्रामसंवाद

ग्रामस्थांच्या समस्या ऐकून तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गावातील शासकीय कार्यालये व विकासकामांची पाहणी

वर्धा : प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘एक दिवस ग्रामस्थांसोबत’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सेलू तालुक्यातील सालई (पेवठ) गावाला भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी गावातील विविध शासकीय कार्यालये व विकासकामांची पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या ग्रामसंवाद कार्यक्रमाला सालई पेवठच्या सरपंच वच्छलाबाई तळवेकर, प्रशिक्षणार्थी आयएएस शोभीका पाठक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ, तहसीलदार डॉ.शकुंतला पाराजे, गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, तालुका कृषी अधिकारी श्री.माहूले, वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राम वरठी, नायब तहसीलदार के.डी.किरसान यांच्यासह विस्तार अधिकारी, ग्रामसचिव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य वर्धिनी केंद्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देताना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आरोग्य केंद्रातील सेवा, औषधसाठा तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी घेतली.

संवादादरम्यान ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, वीजपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या मांडल्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

गावातील युवकांशीही त्यांनी चर्चा केली. रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ युवकांपर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.

ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ‘एक दिवस ग्रामस्थांसोबत’ हा उपक्रम प्रशासन आणि जनतेतील दरी कमी करण्यास तसेच स्थानिक प्रश्न सोडविण्यास प्रभावी ठरत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी यशवंत लडके व सचिन पिसुड्डे, ग्राम महसुल अधिकारी श्री. बरवट, ग्राम सचिव श्री. गाणार, कृषी सहाय्यक श्री. पोकळे, डॉ श्वेता कुत्तरमारे, डॉ. मनिष चव्हाण, पोलीस पाटील श्री. घाटोळे, विस्तार अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये