पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग सेवा समितीच्यावतीने ऑक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ व ‘निसर्ग संदेश’ रजत जयंती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
पर्यावरण दिनानिमित्त या वर्षभरात ट्री गार्डसह एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प निसर्ग सेवकांनी घेतला. त्याचा शुभारंभ डॉ.भोयर यांच्या हस्ते आयटीआय कॉलेज रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मोहन बाबू अग्रवाल, विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक निरमेशजी, कवी संजय इंगळे तिगावकर, डॉ.प्रा.राजेंद्र मुंढे, बुलढाणा अर्बन बँकेच्या विभागीय व्यवस्थापक राजेश्री बगाडे, जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ओंकार धावडे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे सह प्राचार्य कोकुलवार, पीपल फॉर ॲनिमलचे आशिष गोस्वामी, सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे उपस्थित होते.
निसर्ग सेवा समितीच्या कार्यास चार दशके तर ऑक्सिजन पार्कच्या निर्मितीस 25 वर्षे पूर्ण झाली आहे. समितीच्या हरित चळवळीतून आज 25 हजाराहून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांचा हरित पट्टा तयार झाला आहे. आजच्या निराशाजनक वातावरणातही वर्धेतील निसर्ग सेवा समितीचे काम इतरांना प्रेरणादायी आहे. 25 हजार वृक्षांचा पट्टा तयार करणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ.भोयर यांनी यावेळी काढले.
दरवर्षीप्रमाणे यंदाचा रजत जयंती आदर्श निसर्ग हरित शाळा पुरस्कार नीलकंठ मुरार घटवाई कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वडनेर, ता. हिंगणघाट यांना प्रदान करण्यात आला. वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, जल पुनर्भरण, किचन गार्डन हा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवल्याबद्दल प्राचार्य रवींद्रजी गोडे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राजेश बगाडे, प्रमोद भोयर, गवई, भोमले, डॉ. बोरकर, रामदास ढोणे यांनी वृक्ष संरक्षक उपलब्ध करून दिले.
निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी प्रस्ताविक केले. संचालन प्रमोद खोडे यांनी केले. मानपत्राचे वाचन पांडुरंग भालशंकर यांनी केले. आभार सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे यांनी मानले. यावेळी राजेश बगाडे, दिनेश चन्नावार, डॉ. राजेंद्र बोरकर, डॉ. प्रा. राजेंद्र मुंढे, प्रशांत ठाकरे, रवी कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिक, गुरुदेव सेवा मंडळ, पतंजली योग समिती व निसर्ग सेवा समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



