ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवराज्याभिषेकाची आठवण जागवणार ‘स्वराज्य दिन’

चंद्रपूर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना विशेष आदेश ; ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद मुख्यालयापर्यंत कार्यक्रमांची रेलचेल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा ३५२ वर्षे पूर्ण होत असताना, त्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून ६ जून ‘स्वराज्य दिन’ जिल्हाभर उत्साहात साजरा करण्याचे आदेश जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासनाने जारी केले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवस्वराज्याचा विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, शासनाच्या निर्देशांनुसार यंदाचा स्वराज्य दिन केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता लोकसहभाग, स्वच्छता आणि ग्रामविकासाचा संदेश देणारा उपक्रम म्हणून साजरा केला जाणार आहे. ग्रामीण भागात स्वराज्याच्या मूल्यांची जपणूक करत विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

शासन परिपत्रकानुसार, ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्यालयासह सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये एकाच वेळी स्वराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाच्या “स्वच्छ सुंदर समृद्ध गाव” अभियानाला चालना देण्यासाठी स्वराज्य दिनाला स्वच्छता अभियानाची जोड देण्यात आली आहे. गावातील सार्वजनिक स्थळे, शाळा, ग्रामपंचायत परिसर आणि इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

तसेच शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि स्वराज्य संकल्पनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिवाजी महाराजांनी उभारलेले लोककल्याणकारी, न्यायनिष्ठ आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवणारे शासन आजही ग्रामीण प्रशासनासाठी प्रेरणादायी मानले जाते. त्यामुळे स्वराज्य दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाचा संकल्प दिवस ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकसहभाग मिळावा यासाठी ग्रामस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

     *शिवरायांचे स्वराज्य हे केवळ इतिहासातील सुवर्णपान नाही, तर आजच्या ग्रामविकासाचे प्रेरणास्थान आहे. स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध गाव घडविण्याचा संकल्प घेऊन यंदाचा “स्वराज्य दिन” ग्रामीण भागात नव्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये