ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डिझेल टंचाईने शेतीचा खरीप हंगाम धोक्यात!

_बैलजोड्यांना सोन्याचे दिवस मात्र बैलजोड्यांची कमतरता, वाढत्या खर्चाने शेतकरी हवालदिल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांत सुरू होत असताना गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे वेळेत मशागत पूर्ण करण्याची धावपळ सुरू असताना दुसरीकडे निर्माण झालेल्या तीव्र डिझेल टंचाईने शेतीची चाकेच थांबण्याची वेळ आली आहे. परिणामी ट्रॅक्टर शेतात उभे राहत असून अनेक शेतकरी पुन्हा पारंपरिक बैलजोड्यांच्या सहाय्याने मशागत करण्याकडे वळताना दिसत आहेत.

मान्सूनपूर्व वातावरण तयार होताच परिसरातील शेतांमध्ये वखरणी, नांगरणी आणि मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरच्या आवाजाने परिसर दणाणून जात आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी वेळेत पेरणी पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. मात्र, याच वेळी डिझेल टंचाईने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरातील पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक ठिकाणी “डिझेल संपले”चे फलक झळकत असून मर्यादित पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. काही ट्रॅक्टरधारकांना तासनतास रांगेत थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक शेतांतील मशागतीची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत.

डिझेल टंचाईचा परिणाम आता ग्रामीण भागातील पारंपरिक शेती व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. ट्रॅक्टर बंद पडू लागल्याने अनेक शेतकरी बैलांच्या सहाय्याने मशागत करत आहेत. त्यामुळे परिसरात बैलजोड्यांची मागणी अचानक वाढली असून त्यांच्या भाड्यात तसेच खरेदी दरात मोठी वाढ झाली आहे. काही गावांमध्ये बैलजोड्या मिळणेही कठीण झाले आहे. परिणामी लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

एका बाजूला काळ्या सुपीक मातीत धावणारे ट्रॅक्टर, उडणारी धूळ आणि दुसऱ्या बाजूला बैलांच्या सहाय्याने सुरू असलेली पारंपरिक मशागत — असे चित्र सध्या गोंडपिपरी तालुका परिसरात पाहायला मिळत आहे. शेतकरी बी-बियाणे, खतांची खरेदी आणि शेतीची पूर्वतयारी पूर्ण करण्यासाठी धावपळ करत असून कृषी केंद्रांमध्येही मोठी गर्दी दिसून येत आहे.

दरम्यान, डिझेलचे वाढते दर, इंधन टंचाई, मजुरांची कमतरता आणि वाढलेला शेतीखर्च यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरीही “पाऊस चांगला पडेल आणि हंगाम भरघोस जाईल” या आशेवर शेतकरी जिद्दीने शेतात राबत आहेत. प्रशासनाने तातडीने ग्रामीण भागातील डिझेल पुरवठा सुरळीत करून कृषी वापरासाठी स्वतंत्र कोटा उपलब्ध करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

*खरिपाच्या तोंडावर शेतकरी संकटात*
*डिझेल टंचाईमुळे मशागतीची कामे खोळंबली.
*पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा.
*अनेक पेट्रोल पंपावर मर्यादित डिझेल पुरवठा.
*ट्रॅक्टर बंद असल्याने बैलजोड्यांची मागणी वाढली.
*बैलजोड्यांच्या भाडेदारात मोठी वाढ.
*वाढते इंधन दर आणि मजूर टंचाईमुळे खर्चात वाढ.
*शेतीच्या मशागतीसाठी स्वतंत्र डिझेल पुरवठा करण्याची मागणी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये