हिंगणघाट पोलिसांची ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई ; १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
देशी दारूचा दारूसाठा जप्त, दोन आरोपी अटक, एक आरोपी फरार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार सध्या वर्धा जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध ‘वॉश आउट’ मोहीम तीव्रतेने राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने (DB Team) सावली (वाघ) शिवारात धाड टाकून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १,१०,००० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ११०० सीलबंद शिश्या आणि दोन दुचाकी वाहने, असा एकूण १,९०,०००/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ०८५९/२०२६, कलम ६५ (ई), ७७ (अ), ८३ म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. प्रकाश उर्फ गोलू बाबाराव मन्ने (वय ३० वर्ष, रा. सावली (वाघ), ता. हिंगणघाट, रंजित बाबाराव अवघडे वय ३३ वर्ष, रा. सावली वाघ, ता. हिंगणघाट, यांना अटक केली असून आशिष हाडके रा. कडाजना, ता. हिंगणघाट, जि. वर्धा हा फरार आहे.
दिनांक ३१/०५/२०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास हिंगणघाट पोलिसांचे गुन्हे प्रगटीकरण पथक ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत हद्दीत गस्त घालत असताना, सावली (वाघ) ता. हिंगणघाट येथे अवैध दारूची वाहतूक व साठा केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सायंकाळी १७:१० ते १७:५० वाजताच्या दरम्यान घटनास्थळावर प्रो-रेड (धाड) टाकली. धाडीदरम्यान पोलिसांना देशी दारूचा साठा, चार प्लास्टिक चुगड्यांमध्ये भरून असलेल्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या देशी दारूच्या ९० एम.एल. च्या एकूण ११०० सीलबंद शिश्या (प्रती शिशी किंमत १००/- रुपये प्रमाणे) – एकूण किंमत रु. १,१०,०००/ दुचाकी क्रमांक एक बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल (सिल्व्हर रंगाची), आर.टी.ओ. पासिंग क्र. MH 31 BZ 9332 अंदाजे किंमत रु. ३०,०००/- *दुचाकी क्रमांक एक टी.व्ही.एस. कंपनीची ज्युपिटर मोपेड गाडी (कथ्या रंगाची), आर.टी.ओ. पासिंग क्र. MH 34 BK 8591- अंदाजे किंमत ५०,०००/- एकूण जप्त मुद्देमाल किंमतः रु. १,९०,०००/- (एक लाख नव्वद हजार रुपये)
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा, अप्पर पोलीस अधीक्षक, सदाशिव वाघमारे वर्धा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक महेश ईटकल, आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे (DB Team) श्रीकांत खडसे, दिनेश तूमाने, विकास अवचट, राजेंद्र ढगे व प्रमोद जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
फरार आरोपी आशिष हाडके याचा पोलीस कसून शोध घेत असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.



